आपण अंधारात चमकणाऱ्या किटकांना नक्कीच पाहिले असेल. हे चमकणारे किटक म्हणजेच काजवे असतात. या लेखाच्या माध्यमातून काजवे का व कसे चमकतात हे जाणून घेणार आहे.
जगभरात काजव्यांच्या दोन हजार प्रजाती अस्तित्वात आहेत. ते निशाचर प्राणी असल्यामुळे रात्रीच्या वेळीच बाहेर पडतात. अंधारात तुम्ही काजव्यांना चमकताना नक्कीच पाहिले असेल.
काजव्यांना इंग्रजीत ‘फायर फ्लाईज्’ असे म्हणले जाते.

Table of Contents
काजवे कसे चमकतात?
काजव्यांच्या शरीरात लूसिफेरिन नावाचा एक रासायनिक घटक असतो. वातावरणातील ऑक्सिजनची लूसिफेरिन सोबत रासायनिक प्रक्रिया झाल्यावर प्रकाश निर्माण होतो. ही रासायनिक प्रक्रिया कॅल्शियम आणि अडेनोसाईन ट्राय फोस्फेट (एटीपी) यांच्या उपस्थित होते.
अशा प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत बायोलुमिनीसेन्स (Bioluminescence) असे म्हणतात.
आपल्या घरातील बल्बसारखा प्रकाश या काजव्यांच्या शरीरात तयार होत असतो. मात्र ज्याप्रकारे घरातील बल्प उष्णतेमुळे गरम होतो, तशा प्रकारची उष्णता काजव्यांच्या शरीरात तयार होत नाही.
त्यामुळे शास्त्रज्ञ या प्रकाशाला ‘कोल्ड लाईट‘ असे देखील म्हणतात.
जेव्हा काजव्यांच्या शरीरात ऑक्सिजनची उपलब्धता असेल, तेव्हा ही रासायनिक प्रक्रिया घडते. जेव्हा शरीरात ऑक्सिजन उपलब्ध नसेल तेव्हा ही रासायनिक प्रक्रिया थांबते.
या कीटकांच्या शरीरात फुफ्फुसे नसतात. त्यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी गुंतागुंतीच्या नळ्यांचा वापर केला जातो.
तुम्हाला माहीत असेलच की ऑक्सिजनच्या मदतीने शरीरात ऊर्जेची निर्मिती केली जाते.
प्रकाश निर्माण करायच्या वेळी काजव्यांच्या शरीरात नायट्रीक ऑक्साईड नावाचा वायू तयार होतो. या नायट्रीक ऑक्साईडमुळे शरीरात येणारा ऑक्सिजन फक्त प्रकाशाच्या निर्मितीसाठी वापरला जातो.
जेव्हा शरीरात नायट्रिक ऑक्साईड या वायूची निर्मिती थांबते. तेव्हा शरीरात येणारा ऑक्सिजन हा अन्न निर्मितीसाठी आणि ऊर्जेच्या निर्मितीसाठी वापरला.
निसर्ग किती चतुर आहे ना!
काजवे का चमकतात
काजवे दोन कारणांसाठी चमकत असतात. पहिलं कारण म्हणजे संभोगासाठी जोडीदाराला आकर्षित करणं. तर दुसरं कारण म्हणजे शत्रूला चेतावणी देणं.
रात्रीच्या अंधारात चमकणारे काजवे सहसा नरच असतात. जे संभोगासाठी जोडीदाराच्या शोधात असतात. प्रत्येक प्रजातीच्या काजव्याचा चमकण्याचा एक विशिष्ट ‘पॅटर्न’ असतो. यामुळे समोरचा काजवा आपल्या प्रजातीचा आहे का नाही हे मादी काजव्याला ओळखता येते.
नर काजवे हवेतून मादी काजव्याच्या शोधात फिरत असतात. तेव्हा त्यांच्या पोटातून विशिष्ट रंगाचा प्रकाश बाहेर पडतो. मादी काजवे जमिनीवर बसलेली असतात. ते देखील विशिष्ट पॅटर्न मध्ये चमकून नर काजव्याला ‘सिग्नल’ देतात.

Credit: Wikipedia CC BY-SA 3.0
संशोधनांमधून असे दिसून आले आहे की — ज्या नर काजव्यांच्या प्रकाशाची तीव्रता जास्त असते, त्याच्याकडे मादी काजवे आकर्षित होतात.
अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल की काजवे का व कसे चमकतात.
काजवे तुमचा चावा घेऊ शकतात का?
काजवे मानवासाठी हानिकारक नसतात. ते कोणत्याही प्रकारचा चावा घेत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा आजार पसरत नाही.
काजव्यांचे अस्तित्व धोक्यात?
सध्या काजव्यांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे.
रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशामुळे काजव्यांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ लागला आहे. कारण संभोगासाठी मादी काजव्याला आकर्षित करण्यासाठी नर काजवा त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या प्रकाशाचा वापर करतो.
काजवे उंच गवताकडे आकर्षित होतात. ते निशाचर प्राणी असल्याने दिवसा गवतात लपतात आणि रात्री बाहेर येतात.
पण कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे काजव्यांचे अस्तित्व धोक्यात आले
त्याच बरोबर जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे काजव्यांचे अधिवास देखील नष्ट होऊ लागले आहे.
मादी काजव्यांना उडता येत नाही. त्यामुळे त्यांना स्थलांतर करता येत नाही.
कीटकनाशकांचा वाढता वापर देखील काजव्यांचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.