अंतराळवीर म्हणजे अवकाशातील प्रवासी. आजपर्यंत आपल्याला चंद्रावर जायला यश आले आहे. चंद्रावरील वातावरण आपल्या पृथ्वीपेक्षा नक्कीच वेगळे आहे.
त्याठिकाणी गुरुत्वाकर्षण क्षमता कमी आहे, वातावरण नाही, ऑक्सीजन नाही.
त्यामुळे त्या ठिकाणी जिवंत राहण्यासाठी विशिष्ट पोशाखाची आवश्यकता होती. यातूनच अंतराळवीरांचा पोशाख अर्थात स्पेससूटची निर्मिती झाली.
अंतराळवीरांच्या पोशाखाची किंमत एवढी प्रचंड का असते? हा पोशाख नेमक्या कोणत्या प्रकारचे संरक्षण अंतराळवीरांना देत असतो? त्याचबरोबर या संबंधी असणारी इतर माहिती आपण या लेखातून घेणार आहे.
या अंतराळवीरांचा पोशाख काही खास असतो. एका पोशाखाची किंमत तब्बल बारा मिलियन अमेरिकी डॉलर एवढी असते. अर्थात भारतीय रुपयांमध्ये 85 कोटी!
अंतराळवीरांचा पोशाख अर्थात ‘स्पेस सूट’चे काम काय

पृथ्वीच्या वातावरणाच्या तुलनेत अवकाशातील वातावरण हे खूप धोकादायक असते. अंतराळवीरांना वेगवेगळ्या तापमानाला तोंड द्यावे लागते.
पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालत असताना काहीवेळेस तापमान उणे 157 डिग्री सेल्सियस इतके कमी होते. तर कधीकधी सूर्यप्रकाशात हेच तापमान 121 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते.
अशा प्रचंड तापमानापासून अंतराळवीरांचे रक्षण त्यांचा पोशाख करत असतो.
त्याच बरोबर सूर्यामधून वेगवेगळ्या किरणांचं उत्सर्जन होत असते. यांना इंग्रजीत सोलार रेडिएशन असे म्हटले जाते. हे रेडिएशन मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात.
पृथ्वीवर असताना पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्डमुळे आपले रक्षण होते. मात्र अवकाशात हे काम पोशाख करत असतो.
त्याचबरोबर अवकाशात ऑक्सिजन नसतो. त्यामुळे ऑक्सीजन पुरवण्याचे कामदेखील अंतराळवीरांचा पोशाख करत असतो.
अंतराळवीर अपघाताने अवकाशात गेल्यावर काय होतं

अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसारख्या ठिकाणी काम करत असताना स्टेशनच्या बाहेर येऊन दुरूस्त्यांच काम करावे लागते.
अशावेळी अंतराळवीर स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या दोरीने स्टेशनला बांधून ठेवतात. त्याचबरोबर खालील छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अंतराळवीर रोबोटिक आर्म मध्ये बसून देखील कामे करू शकतात.

जर चुकून त्यांचा पोशाख किंवा स्पेससूट योग्य पद्धतीने बांधला गेला नाही, तर ते अवकाशात जाऊ शकतात.
अशावेळी त्यांच्या पोषाखामध्ये छोट्या आकाराची जेट इंजिन असतात. ज्याच्या मदतीने ते पुन्हा स्पेस स्टेशन वर येऊ शकतात.
अंतराळवीर नारंगी स्पेससूट कधी वापरतात

अंतराळवीर नारंगी रंगाचे पोशाख देखील घालतात. यांना लॉन्च आणि एंट्री सूट असं म्हटलं जातं.
कारण हा पोशाख उड्डाणाच्या वेळी तसेच पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याच्या वेळी घातले जातात.
या पोशाखाची मर्यादा अशी आहे की अवकाश यानाच्या आतच हे पोशाख घालावे लागतात.
आहे ना रंजक माहिती?
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.