‘या’ ग्रहावर पडतोय चक्क लोखंडाचा पाऊस

iron-rain-planet-marathi
Iron Rain Planet

पृथ्वीवर पाण्याचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सूर्यमालेतील शुक्र ग्रहावर सल्फ्यूरिक ऍसिडचा पाऊस पडतो तर नेपच्यून ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो.

अलीकडेच आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने एका ग्रहावर लोखंडाचा पाऊस पडत असल्याचे शोधून काढले आहे.

लोखंडाचा पाऊस पडणाऱ्या ग्रहाचं नाव ‘वास्प 76-बी’असून हा ग्रह पृथ्वीपासून 640 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा ग्रह पूर्णपणे वायूंनी बनलेला आहे.

हा ग्रह एका ताऱ्याभोवती अत्यंत जवळून फिरत आहे. या ग्रहाला ताऱ्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी फक्त 43 तासांचा कालावधी लागतो.

आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तब्बल 365 दिवसांचा कालावधी लागतो.

प्रचंड तापमान आणि लोखंडाची वाफ

हा ग्रह ताऱ्यांच्या जवळून प्रदक्षिणा घालत असल्याने येथील तापमान देखील प्रचंड आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान 2000 डिग्री सेल्सियस इतके आहे.

एवढ्या तापमानामुळे ग्रहाच्या वातावरणात अस्तित्वात असलेल्या लोखंडाची वाफ होते.

या ग्रहाच्या बाबतीत एक विशेष बाब शास्त्रज्ञांना समजली आहे. ज्याप्रमाणे चंद्राची आपल्याला नेहमी एकच बाजू दिसते, अगदी त्याचप्रकारे या ग्रहाची एकच बाजू तार्‍याच्या दिशेला आहे.

यामुळे या ग्रहाची एक बाजू कायम तार्‍याकडेच असते तर दुसरी बाजू अंधारात असते. या अंधारातील बाजूचं तापमान 1400 डिग्री सेल्सिअस आहे .

थोडक्यात या ग्रहाची एक बाजू अत्यंत तप्त तर दुसरी बाजू तुलनेने थंड असते.

या तापमानातील फरकामुळे या ग्रहावर प्रचंड वेगाने वारे वाहतात. संशोधकांनुसार या ग्रहावरच्या वाऱ्याचा वेग 18 हजार किलोमीटर प्रतितास एवढा आहे.

असा पडतो लोखंडाचा पाऊस

पृथ्वीवर पाऊस पाण्याच्या वाफेमुळे पडतो. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते. या वाफेचे ढग तयार होतात व काही ठराविक उंचीवर ते जातात.

त्या ठिकाणी ढगांना थंड हवा लागल्यावर वाफेचे रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होते. तेथे हजारो थेंब एकत्र आल्यानंतर वजनामुळे ते खाली कोसळू लागतात. अशाप्रकारे पृथ्वीवर पाऊस पडतो.

वास्प 76-बी या ग्रहावर वेगाने वारे वाहतात. वेगवान वाऱ्यामुळे दिवस असणाऱ्या भागातील लोखंडाची वाफ अंधारात असलेल्या भागाकडे वाहून जाते.

अंधारातील भागाचे तापमान तुलनेने कमी असल्याने लोखंडाच्या वाफेचे रूपांतर थेंबामध्ये होते आणि त्याचा पाऊस पडतो.

संशोधकांच्या मते हा शोध पुढील अभ्यासासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. शेअर केल्याने ज्ञान वाढते.

Leave a Comment